Sunday, 9 December 2012

अविरत जे झिजले कण-कण ......व्यर्थ न हो तयांचे जीवन !

स्व.भाऊसो . पद्मसिंह सिसोदिया (पदम मास्तर)
काही गावे अशी असतात की , जांच्या वरून माणसं ओळखली जातात.....परंतु काही माणसे अशी असतात कि जांच्या वरून गावे ओळखली जातात.....अशीच एक ओळख निर्माण केलेले किंबहुना ज्यांच्या नावावरून सुराय ह्या गावाचे नाव अखिल भारतात ओळखले जाऊ लागलेले होते त्या गावाचे आद्य नागरिक.....जनसंघाचे जेष्ठ नेते तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक म्हणून स्व. भाऊसाहेब  पद्मसिंहजी नाटुसिंहजी सिसोदिया उर्फ पदम मास्तर यांचा परिचय देता येईल.
  भाऊसाहेबांचा  जन्म २ जून १९२० रोजी त्यांच्या आजोळी अहिल्यापूर (ता.शिरपूर) येथे झाला. त्यांचे घराणे सुराय  येथील जमीनदार घराणे म्हणून ओळखले जाई. पाच भाऊ आणि पाच बहिण अशा एकूण दहा भावंडा मध्ये भाऊसाहेब हे थोरले होते. गोकुळा सारखे मोठे घराणे व भरपूर जमीन-जुमला असल्याने दारी वैभव नांदत   होते. लहान पणापासून जोर-बैठका ; घोडेस्वारी, तलवारबाजी, लाठीमार, पोहणे आदी मर्दानी प्रकारात त्यांनी आपले नाव कमावलेले होते. लाठीमाराच्या कौशल्याबाबत तर त्यांचा हाथ कोणीही धरू शकत नव्हता ....या कलेमुळे अनेकदा त्यांचा चोर व गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा प्रतिकार करताना उपयोग झाला होता. भरपूर व्यायामामुळे त्यांनी बलदंड शरीर यष्टी कमावलेली होती.  त्यांचा आहार पाहून भले-भले पहेलवान दचकत असत. ते कधीही आजारी पडलेले  नव्हते. कच्च्या पालेभाज्या आणि चणे-शेंगदाणे हा त्यांचा खुराक होता.घरीच प्राथमिक अक्षरे गिरवल्यानंतर पुढील शिक्षणासाठी धुळे येथील इंग्रजी शाळेत त्यांचे नाव दाखल करण्यात आले होते . जुनी मॅट्रीक पर्यंत शिक्षण त्यांनी घेतलेले होते. लहानपणी आज्ञाधारक बालक म्हणून ते ओळखले  जात. सुटीत धुळे येथून परत येताना त्यांच्या जवळचे भाड्याचे पैसे एका गरजू मुलास त्यांनी दिले होते व स्वत: पायी प्रवास केला होता या वरून बालपणीच दातृत्वाचे संस्कार त्यांच्या मनावर किती खोलवर रुजलेले होते याची प्रचीती येते. परमपूज्य डॉक्टर हेडगेवारजी यांनी संघाची उभारणी जोरात चालविलेली होती. भाऊसाहेब नागपूर येथे शिक्षणासाठी गेले . तेथे परमपूज्य आद्यसरसंघचालक डॉ हेडगेवारांशी त्यांचा परिचय झाला . स्व डॉ मुंजे यांच्या तालमीत भाऊसाहेबांनी संघ आत्मसात केला .
धुळे येथील संघाच्या शाखेचे ते प्रथम स्वयंसेवक होते.  संपूर्ण परिसरात ते मास्तर या टोपणनावाने परिचित होते.

घरचे जमीनदार असल्याने व त्या काळात  नोकरी कमी प्रतीची मानली  जात असल्याने शेती साठी ते घरी परतले. स्वातंत्र्यापूर्वी त्यांनी पुणे येथे  संघ शिक्षक म्हणून  अल्प काल सेवा बजावली होती. संघाची विविध शिबिरे देशभर होत....भाऊसाहेब प्रत्येक शिबिरात सहभागी होत.  १९४४ मध्ये सुराय  या आपल्या गावी त्यांनी संघाची शाखा सुरु केली .... या शाखेत गावातील मुले आणि युवक मोठ्या उत्साहात सहभाग घेत.....राष्ट्रभक्तीचे संस्कार त्यांनी आपल्या मातीत रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तो काळ पारतंत्र्याचा होता.....नेताजी बोस यांचे चरित्र त्यांना नेहमीच खुणावत असे.  भूमिगत कार्यकर्त्यांच्या निरोपाची ने-आन त्यांचा बाल चमू शिताफीने करीत असे....इंग्रज पोलिसांची नजर त्यांचेवर नेहमी असे परंतु त्याचा थांगपत्ता ते कधीही लागू देत नसत. नागपूर येथील ओ.टी .सी. शिबिरात सहभागी झाल्यानंतर धुळे जिल्हा संघचालक म्हणून त्यांनी यशस्वी रित्या जबाबदारी पार पाडली. या काळात संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात ते असत.  १९४८ मध्ये गांधी हत्येनंतर संपूर्ण देशभर धरपकड करण्यात येत होती......त्यात भाऊसाहेब सुद्धा चार महिने तुरुंगात होते. स्वत:ची धर्मपत्नी वारल्या तरीही सरकार ने त्यांची पॅरोल वर सुटका केली नव्हती. तुरुंगवासातून परतल्यानंतर भाऊसाहेब गावो-गावी गेले व संघाच्या शाखांची उभारणी जोमाने केली. याच काळात त्यांचा रामी येथील जमीनदार स्व.इंद्रसिंग जी जाधव यांची कन्या रुखत कुंवर यांचेशी दुसरा विवाह झाला.
१९५२ च्या दुष्काळात लोकांना मदत म्हणून गुरांची छावणी निर्माण करून मुकी जनावरे वाचविण्याचे प्रयत्न केले. दुष्काळी केंद्र उभारून  रेड-क्रॉस च्या मदतीने दुष्काळ ग्रस्तांना धान्य -कपडे- दुध-भाजी भाकरी आदी वाटप त्यांनी केले.  घरचे जमीनदार असलेल्या भाऊसाहेब यांनी गोर-गरिबांसाठी आपले धान्याचे कोथर सदैव खुले ठेवलेले होते.....त्यांच्या पूर्वजांना कवाड मध्ये मिळालेली जमीन जेथे होती तेथे आदिवासी भिल्ल जमातीच्या लोकांची वस्ती त्यांनी वसविलेली होती...जी मंडळी त्यांच्या शेतांवर काम करीत असे. कवाड  या नावावरून त्या गावाचे नाव कवाडे व नंतर कलवाडे असे झाले. या संपूर्ण वस्तीत भाऊसाहेब यांचा  पितृवत सन्मान केला जाई. त्यांनी तालीम दिलेले ;शिक्षणात मदत केलेले अनेक जन आज महत्तम पदांवर पोहोचलेले आहेत.  एका हाथाने दिलेले दान दुसऱ्या हातालाही ते कळू देत नसत. सायकल हे त्यांचे आवडते वाहन. पुणे-मुंबई-धुळे येथे ते आवर्जून सायकलीने जात असत. गोवा मुक्ती संग्रामावेळी सुराय ते गोवा असा सायकल प्रवास त्यांनी केला होता . सुप्रसिध्द पार्श्वगायक सुधीरजी फडके यांचा सहवास यावेळी त्यांना लाभला होता .
१९५९ मध्ये सुराय ग्रामपंचायतीचे प्रथम सरपंच म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. त्या काळात लोकसहभागाने गावातील प्रश्न त्यांनी सोडविले होते. आपल्या सरपंच पदाच्या काळात त्यांनी घरून जेवणाची सोय करून गावकऱ्यांच्या सामूहिक श्रमदानातून   सुराय  ते मालपुर अशी चार कि.मी. लांबीची सडक त्यांनी तयार केली होती. गावात प्राथमिक शाळा सुरु केली.अधिकारी वर्गात त्यांच्या प्रती प्रचंड आदर व दरारा होता. १९६२ मध्ये त्यांचे स्नेही उत्तमराव पाटील यांनी लोकसभे साठी तर भाऊसाहेब यांनी विधान सभेसाठी जनसंघातर्फे दिवा या चिन्हावर निवडणूक लढविली. तेव्हापासून जनसंघाचे नेते म्हणून त्यांनी कार्य सुरु केले. परमपूज्य हेडगेवारांच्या जीवनापासून आदर्श घेतलेले भाऊसाहेब १९७६ मधील आणीबाणी च्या काळात कारावासात होते. याच काळात त्यांची अटल बिहारी वाजपेयी ,मोरोपंत पिंगळे, नानाजी देशमुख , रज्जू भैय्या ,हशू अडवाणी आदी मंडळीच्या सहवासात  कालक्रमणा सुरु होती.  राजकैदी म्हणून नाशिक च्य कारागृहात आठ महिने ते होते....तत्पूर्वी दहा महिने भूमिगत राहिले....व लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे सोबत तीन दिवस थांबून नागपूर ---गोरखपूर--पुणे--मुंबई--ग्वाल्हेर--जयपूर इ. ठिकाणी त्यांनी भूमिगत राहून प्रचार केला. रामी येथे एका पारवारिक समारंभास आलेले असताना गावातील एका फितूर व्यक्तीने पोलिसांना गुप्त रित्या माहिती पुरविली आणि भाऊसाहेब यांना अटक झाली.
गरजवंतास मदत करणे; दुर्बलांचे रक्षण करणे ;प्रसंगी लोकहितासाठी पदरमोड करणे ;गोर-गरिबांच्या दु:खात सहभागी होणे हि त्यांची खास वैशिष्ट्ये सांगता येतील.  त्यांनी शेतीवर केलेले प्रयोग पाहून अनेक शेतकरी थक्क होत.  विविध प्रकारची फुलझाडे; फळ झाडे; आमराई; भाजीपाला; कोंबड्या-शेळ्या -ससे --कबुतरे आदींची मळ्यात रेलचेल असे.....त्यांचा मला म्हणजे भरलेले गोकुळ वाटे....अनेक दिग्गज मंडळी त्यांच्या शेतावर येवून गेलेली होती...स्व प्रमोद महाजन व स्व गोपिनाथजी मुंडे युवा संघप्रचारक असतांना सुराय येथे येत . भाऊसाहेबांच्या शेतात थांबत असत . स्व प्रधानमंत्री मा अटलबिहारी वाजपेयी यांनी भाऊसाहेबांचे सुराय गावी भेट दिली व भोजन केले होते .भाऊसाहेब यांना फक्त दोन कन्या होत्या मोठी आशा व लहान लता. भाऊसाहेब यांनी आपल्या मुलींवर हि उच्च संस्कार केलेलं होते.  जावयांवर  सुध्दा निस्सिम प्रेम केलेले होते. त्यांचे मोठे जावई श्री गोविंद सिंह हे होळनांथे गावात शेती करतात तर लहान जावई श्री रणवीर सिंह हे मुंबई येथे मंत्रालयात अधिकारी होते. आपल्या साडू चे चिरंजीव स्व.विक्रमसिंह हे मालपुर येथे शिक्षक होते. श्री विक्रमसिंह गिरासे यांचेवर पुत्रवत त्यांनी प्रेम केलेलं होते. श्री लखन जी भतवाल; स्व.उत्तमराव पाटील; स्व.दिलवरसिंग पाडवी ; स्व.प्रल्हादराव पाटील; नारायण फौजदार; स्व.रजेसिंग गुरुजी ; स्व.अजबसिह भाऊसाहेब ;नानाजी जोशी आदी त्यांचे खास स्नेही होते. मालपुर येथील स्व. मेजर साहेब; स्व.तखतसिंहजी रावल; स्व. विजयसिंहजी रावल आणि स्व. नरेंद्रसिंहजी रावल आदी त्यांचे परम मित्र होते. स्व . शिवाजी दामू पाटील हे त्यांचे खास अनुयायी होते .त्यांनी राजकारण विरहीत मैत्री जोपासली होती.  आपल्या आयुष्यात निस्वार्थी पणे  सदैव कार्यरत ते राहिले.  कधीही जमा-खर्चाची तमा केली नाही.....भौतिक जीवना पेक्षा निसर्ग सहवासाचा त्यांना अधिक ध्यास होता. शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप हि त्यांची दैवते. त्यांचा आदर्श त्यांनी नेहमी जोपासला. ओठात एक अन पोटात दुसरे असा त्यांचा स्वभाव नव्हता.
विजयादशमी च्या आदल्या रात्री त्यांनी गावातील स्वयंसेवकांना सूचना केली कि उद्या आपणास शस्र-पूजन आणि सामुहिक संचालन करावयाचे आहे...म्हणून तयारी करून ठेवा .....दुसऱ्या दिवशी पहाटे ते झोपेतून  उठले व घरगडी अंगणात शेणाचा सडा  टाकत होता ...त्याचेशी बोलत असताना भाऊसाहेब ओट्यावर बसले ते पुन्हा कधी हि न उठण्यासाठी......! विजयादशमी च्या दिवशी सकाळी दि.१४/१०/२००२ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. भाऊसाहेब यांच्या अंत्ययात्रेत हजारो लोकांनी सहभाग घेतला होता....सजविलेल्या वाहनावर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आलेले होते....त्यांच्या अंत्ययात्रेत गणवेशधारी स्वयंसेवकांनी संचालन केले होते. स्व भाऊसाहेबांना शत-शत नमन !
-------लेखक: श्री. जयपालसिंह विक्रमसिंह गिरासे ,शिरपूर जि .धुळे (महाराष्ट्र) मो:९४२२७८८७४०
(लेखक हे स्व.भाऊसाहेब यांचे नातू आहेत)

Tuesday, 30 August 2011

कट्ट्यावरचे शब्दबाण....!



अलीकडे अनेक  महर्षी उदयास येत आहेत.चरित्र आणि चारित्र्य नसणारी.......ज्ञानाचा कोणताही लवलेश किंवा पात्रता नसणारी मंडळी विविध  क्षेत्रात  शेफारत आहे. नुकतेच  बाबुश नावाच्या  एका  इसमास   कस्टम च्या लोकांनी जेरबंद केले. म्हणे त्याच्या थैली    मध्ये करोडो रुपयांचे परकीय चलन होते. हा इसम कोणी चोर व दरवडेखोर नाही तर ते महाशय चक्क गोवा  राज्याचे शिक्षण मंत्री आहेत म्हणे. बहुदा शिक्षण क्षेत्राच्या प्रसारासाठी त्यांनी हे धन संकलित केले असावे.....पूर्वी आपले थोर समाज-सुधारक  सुद्धा जनते कडून द्रव्य गोळा करून गरीब मुलांच्या शिक्षणाची तहान भागवीत होते. कदाचित बाबुश महोदयांना देखील अशाच ज्ञान मंदिराचा पाया घालायचा असेल म्हणून त्यांनी द्रव्य संचय करायला सुरुवात केली असेल. द्रव्यसंचय करणारा फक्त अलम दुनियेत बाबुश साहेब एकटा नाही तर अक्ख्या दुनियेतील मंत्री आणि बाबू लोक असतील.......दुर्दैवाने बाबुश सापडला पण बाकीच्या बाबूंचे काय......?
सांप्रत चा इतिहास आम्हाला बदलावा लागेल......सुरेश कलमाडी, ए.राजा, बाबुश ह्या मंडळी ने नवनवे उच्चांक मोडलेत.........आदर्श तर सर्वश्रुत आहेच.........आहे रे- नाही रे नावाची दरी वाढत आहे......ज्याच्या हाती सत्तेचा पंदा  आहे त्याची चलती आहे......परवा--परवा तर विरोधी पक्ष हि डील होऊ लागलेत....अशी बातमी ऐकायला मिळाली.....सुपाऱ्या घेऊन आरोप करणे.....चौकशीचे आणि बदनामीचे शुक्लकाष्ठ मागे लाऊन आपले इप्सित साधू पाहणारे शुद्र  राजकारण ह्या महाराष्ट्रात फोफावू लागले.......सार्वजनिक जीवनातील शुचिता आणि नीतिमत्तेचा अंत झाला कि काय असे वाटू लागते.....जळगाव जिल्ह्यातील एका आमदारावर तर चक्क बलात्काराचा आरोप झाला.......पक्षाने तातडीची कार्यवाही केली म्हणजे पाणी कोठे तरी मूरत आहे हे निच्छित......!  ज्याला लोकशाहीचा चौथा खांब आम्ही म्हणतो ....जे स्वतःला समांतर न्यायालय समजून आपले विचार वाचकांवर किंवा प्रेक्षकांवर लादत  असतात त्या वृत्तपत्रे आणि वाहिन्यांची विश्वासार्हता हि संपण्यात जमा झालेली आहे.पीत पत्रकारितेला उत आलाय . नको त्यांना प्रसिद्धी देणारे हे बोल=घेवडे लोक फार शिरजोर झालेत. हि दांभिक मंडळी स्वतःला आजचे चित्रगुप्त समजायला लागली आहे.इतरांचे भविष्य आणि भाकीत वर्तवायला लागलीये...आंधळ्यांनी हत्तीचे स्पर्श करून आपले अनुमान सांगावे अशीच गम्मत ह्या मंडळींची हि झालेली आहे. हफ्ते आणि तोडी-पाणी च्या बाबतीत तर त्यांनी गुंड वा पोलीस लोकांना हि मागे टाकलेय ........अण्णासाहेब हजारे मुळे माहिती अधिकार कायदा लागू झाला पण त्याचा उपयोग केवळ तोडी-पाणी साठी किंवा त्रास देण्यासाठी होतो आहे....  ज्याचं नाव घेऊन आम्ही जयजयकार करतो.....आमच्या छात्या फुलून येतात....गर्वाने माना उंचावतात त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात असे प्रकार होताहेत हेच आमचे दुर्दैव.......! जर महाराज असते तर ह्यांचा कडेलोट केला असता........! प्रत्येक सात्विक मनाला प्रचंड संताप येत असतो. हा संताप आमचे तरुण जिम मध्ये जाऊन बॉक्सिंग च्या थैलीवर किंवा व्यायामात जिरवतात ......आमच्यासारखे आर्कुट/फेसबुक/किंवा ब्लोग वर व्यक्त करतात. एकीकडे इजिप्त,लिबिया,सिरिया तील क्रांती चा अंगार तप्त होत असतो...दुसरीकडे क्रिकेट चा वर्ल्ड कप जिंकण्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी फटाक्यांची आतिश बाजी होत असते.....आणि या सर्व भाऊ गर्दीत आम्ही मूळ समस्या विसरून जात असतो. जनतेला जणू सार्वजनिक डीमनेशिया झाला आहे काय अशी शंका वाटू लागते.याही परिस्थितीत अण्णा हजारे जंतर-मंतर वर उपोषणाचा एल्गार  करतात........सुप्त होत जाणारी------धूसर होत जाणारी आशा पुन्हा जगू लागते......!  उपोषण सुरु होते....सम्पूर्ण  देशभर   वातावरण ढवळून निघते.... "मी अण्णा हजारे आहे !" नाव असलेल्या टोप्या सगळीकडे दिसू लागतात.....कालपर्यंत जी तरुण पिढी बिघडली असा आरोप होत होता...तीच तरुण पिढी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या समर्थन साठी गावोगाव  प्रभात फेरी काढते....!  दूरचित्रवाणी ,वृत्तपत्रे आदी चर्चेची गुऱ्हाळे सुरु करतात....! अगदी चित्रगुप्त सारखा आव आणून काही मंडळी आपले भाष्य करीत असते......! सरकार काही ना काही अपशकून करून हे आंदोलन शमवू पाहत होते, परंतु वाढत्या जनरेट्यापुढे  नमते घ्यावे लागले......अण्णांशी बोलणी करून उपोषण थांबविले गेले.....आता मिडिया चर्चा करू लागली आहे कि फेसबुक ,आर्कुट ,गुगल सर्च आदी ठिकाणी अण्णा हजारे नामक व्यक्ती ने लोकप्रियतेचे सारे रेकॉर्ड मोडीत काढले.......हतबल कॉंग्रेस......असमर्थ आणि पोखरलेला ..दुबळा विरोधी पक्ष....साऱ्यांना   आश्वस्त करू शकेल अशा नेतृत्वाचा अभाव....तरीही    ७४ वर्षाचे राळेगण सिद्धी चे अण्णा दिल्लीच काय देशातील प्रत्येक गल्ली-गल्लीत चर्चिले जातात....कट्ट्यावर आशेचे निखारे पेट घेऊ लागतात ......पुन्हा नसा-नसातून रक्त सळसळू लागते....  मुठा आवळल्या जाऊ लागतात.....तोंडातून जोरात शब्द बाहेर येतात...."जय हिंद....!"
---------जयपालसिंह विक्रमसिंह गिरासे,
५०, विद्याविहार कॉलनी,शिरपूर 
९४२२७८८७४०             

Friday, 15 April 2011

"लोकमत" ने माणुसकी आणि देशप्रेमाचा झरा जिवंत ठेवला.......!

 
ज्या शहिदांचे फक्त नाव घेता आम्हा सर्वांचे हृदय अभिमानाने भरून येते....ज्यांच्या अपूर्व त्यागाचे  गोडवे आम्ही आज हि गात असतो........ज्यांच्या असीम त्यागामुळे आम्ही आजच्या स्वतंत्र राष्ट्रात राहतो...त्यांच्या प्रती आम्ही .....आमचे नेते.....आमचे सरकार किती उदासीन आहे....याचा प्रत्यय बऱ्याचदा आलेला आहे.....तरी  कोणालाही जाग येत नाही. ज्यांनी हसत -हसत घरादारावर विस्तव ठेऊन उभ्या आयुष्याला देशासाठी कुर्बान केले....त्या शहीद क्रांतीवीरांप्रती आम्ही एवढे उदासीन.....एवढे कृतघ्न का झालो? याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. जालियान वाला बाग हत्याकांड चा जनक जनरल डायर ची हत्या करून बदला घेणारे शहीद उधमसिंग इतिहासाच्या पानावर आम्ही वाचतो....त्यांच्या त्या कृतीचा व त्यागाचा आम्ही गौरव करतो....त्यांचेच  वारस जितसिंग आणि त्यांची मुले अत्यंत काबाडकष्ट करीत जीवन कंठीत आहेत.....मोलमजुरी त्यांच्या नशिबी आलेली आहे........उधमसिंग यांचा आत्मा कधीही अपेक्षा करणार नाही .....ज्यांनी या देशासाठी सर्वस्व अर्पिले ते कोणती अपेक्षा करणार..? पण हे आमच्या नेत्यांचे....सरकारचे आद्य कर्तव्य होते कि त्यांनी कृतज्ञता म्हणून शहीद उधमसिंग यांच्या वारसांची दखल घ्यायला हवी होती.....! ज्या देशात एकेका चौकार आणि सत्कार साथी लोकहो रुपयांची खिरापत वाटली जाते.........मंत्री-संत्रींच्या सत्कार व सुरक्षेवर करोडो रुपये खर्चिले जातात....श्रीमंतांच्या चंगळ वादी जीवनशैलीवर धनाची बरसात केली जाते.....त्याच देशात या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाची आहुती देणाऱ्या महान देशभक्तांच्या वारसांची.....सीमांचे रक्षण करणाऱ्या शहीद जवानाच्या कुटुंबियांची अशी हि परवड व्हावी हि बाबच शरम आणणारी आहे.....! 
सर्वत्र कृतघ्न मंडळीचा संचार झाला.......भ्रष्ट ...नतद्रष्ट मंडळींचा वावर झाला......जणूकाही अंधार झाला.....आमच्यातील माणुसकी आटली असे वाटू लागले.  थोड्या थोड्या बाबींवरून ......इतिहासातील घटनांवरून.....रस्त्यावर उतरून आजही आकांड-तांडव करणारे तथाकथित लोक हि या विषयावर गप्प राहिले हि बाबच मोठी खेदजनक आहे......तरीही ह्या परीस्थित दैनिक लोकमत ने माणुसकी आणि देशप्रेमाचा झरा जिवंत ठेवला......शहीद उधमसिंग यांचे वारस जितसिंग यांचा सुमारे अकरा लाख रुपयांची मदत करून गौरव केला.....शहिदांच्या कुटुंबियांना मदतीचा मोठा आधार दिला...हि बाब आशादायी आहे. दै.लोकमत चे प्रमुख श्री विजयजी दर्डा यांनी स्वत: लक्ष घालून हे कार्य तडीस नेले त्याबद्दल या देशातील तमाम देशप्रेमी जनता त्यांचे आभारी आहे.......दैनिक लोकमत चे हे कार्य स्वर्गीय बाबूजी च्या देशप्रेमाची आठवण जरूर देते.........दैनिक लोकमत चे त्रिवार अभिनंदन.......!

Thursday, 14 April 2011

हि कैसी दांभिकता....!

नुकतीच अन्न हजारेंच्या उपोषणाची दिल्लीत सांगता झाली. जनतेने जय-जयकार केला....मिडिया ने सारे कव्हरेज टिपण्याचा अथक प्रयास केला.....कट्ट्या-तट्यावर चर्चांना आलेले उधान शमू लागले......स्वत:ला समांतर शासन अथवा न्यायालय समजू लागलेल्या तथाकथित पत्रकार....संघटना आदी मंडळी जाम  खुश झाली.शासनकर्त्या जमातीने हि अखेर नि:श्वास सोडला.अन्न राळेगण सिद्धी ला परतले...जंगी स्वागत मायभूमीत झाले....अटकेपार झेंडे लावणाऱ्या मराठी गड्याने साक्षात दिल्ली हलवून सोडण्याचा आनंद अपूर्व असाच आहे...असो.
   पण म्हणतात न कि काही चांगले झाले कि ते आपल्यातीलच काहीना सहन होत नाही म्हणून....!  उपोषणाच्या बातम्यांच्या रिक्त रकान्यात समस्त मिडिया जगत नव्या बातम्या शोधीत असताना आमच्याच समाजसेवी मंडळीनी हि अडचण हि पूर्ण केली.  निमित्त ठरले ते नरेंद्र मोदी व नितीशकुमार यांच्या वर अण्णांनी स्तुतिसुमने उधळली त्या गोष्टीचे आणि समस्त --नेमस्त मंडळी नाखूष झाली.....नेमस्त मंडळीने हि मिडिया समोर आपली भडास मोकळी केली.....!
सामान्य माणसाला प्रश्न पडला....अण्णांचे काय चुकले?   कालपर्यंत अण्णा हजारे यांच्या पाठीशी मेधाताई पाटकर, मल्लिका साराभाई, अरुणा रॉय, संदीप पांडे, कविता श्रीवास्तव इ. मंडळी होती. ह्या मंडळी बाबत ...त्यांच्या समाज-सेवेबाबत समस्त दुनियेत आदर आहे ह्यात शंका नाही. मग हि मंडळी खप होण्याचे कारण काय?
शांतीभूषण---प्रशांत भूषण ह्यांच्या समावेशाबाबत बाबा रामदेव ह्यांनी शंका उपस्थित केल्यावर ह्या मंडळीने बाबा रामदेवजी वर ताशेरे ओढले होते. आता हीच मंडळी अण्णा हजारेंवर ताशेरे ओढीत आहे.
नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार ह्या नेत्यांनी आपल्या राज्यातील ग्रामविकास ज्या गतीने केला आहे त्यास संपूर्ण देशात तोड नाही. साहजिकच अण्णा हजारेनी त्यांची तारीफ केली ...ह्यात वावडे ते काय? पण उपर निर्दिष्ट समाजवादी मंडळीस मोदी आणि नितीशकुमार ह्यांचे भारी वावडे आहे.........हि मंडळी जिवंत आहे हे देखील ह्या लोकांना खटकत असेल असे मला वाटते....! हे स्वत:स समांतर न्यायालय समजू लागले आहेत कि काय? .ह्या देशात कोण चांगले आणि कोण वाईट हे प्रमाणपत्र ह्या मंडळीने वाटण्यास सुरुवात केली कि काय अशी शंका वाटू लागलेली आहे.  एकंदरीत एवढा संकुचित दृष्टीकोन ह्या उभय मंडळींकडून देशाला व पर्यायाने जनतेला अपेक्षित नाही. हि दांभिकता नाही काय.....?

Wednesday, 6 April 2011

आफ्रिदीचे ऐसे बरळणे दळभद्री ......!

नुकताच भारत -पाक सामना झाला.....दोन्ही देशातील जनतेने आणि नेत्यांनी  ह्या सामन्याचा आनंद लुटला......दोन्ही बाजूनी स्वप्नाळू आणि आशावादी लोकांनी (ज्यांना व्यर्थ वेळ आणि पैसा खर्च करण्याची हौस असते.....त्यांच्या खिशातून जात नाही म्हणून....!) चर्चेची गुऱ्हाळे सुरु केली. ''येरे माझ्या मागल्या अन शिळ्या  भाकरी चांगल्या'' ह्या  उक्तीनुसार पुन्हा पुन्हा तेच व्यर्थ प्रयोग करण्यात ह्या मंडळीना फार उत्साह येतो असे म्हणतात...!  असो....भारताने पाक ला पराभूत केले.....पाहता पाहता लंका हि सर केली आणि विश्व कप  हि जिंकला....!
वृत्तपत्रे.....दुरचित्र वाहिन्या आणि कट्टे-तट्टे आदींवर शिमग्या नंतरचे  कवित्व हि सुरु झाले......!
ह्यात कडी कि काय ज्याच्यावर आम्ही एक गुणी खेळाडू म्हणून अपार प्रेम केले.....त्या आफ्रिदी नामक व्यक्तीने अकलेचे तारे तोडले आणि अलम दुनियेत त्यावर रकाने भरून निघाले.....माध्यमांना वैरण मिळाली.
भारताकडून सपाटून मार खाल्यावर म्हणे ह्या आफ्रिदीने पाक ला परत गेल्यावर भारत देशाबाबत पाकी मानसिकतेत एव्हढा राग का आहे असे विधान केले.....त्याच्या ह्या विधानावर आमच्याकडील स्वप्नाळू मंडळीना हि जाम आनंद झाला....आफ्रिदीच्या खिलाडू वृत्तीवर स्तुतिसुमने उधळली जाऊ लागलीत. काही सज्जनांनी तर उभय देशात सौहार्द निर्माण करण्यासाठी हा आफ्रिदी मोठा दुवा ठरेल असे भाकीत हि वर्तवल्याचे एकण्यात आले............त्याचे हे विधान ऐकून उभय देशातील क्रिकेट चाहत्यांच्या मनात आफ्रिदी बद्दल आदर निर्माण झाला....नाहीतरी आम्ही भारतीय हीच भावना बाळगत  आलेलो आहोत हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. खेळ आणि खिलाडू वृत्ती जगाने भारताकडून शिकावी असे लिहिण्याचे  धाडस हि आम्ही  करतो. आफ्रिदी बद्दल अभिमान वाटू लागत असताना त्याने दुसर्याच दिवशी पुन्हा गजहब केला...... म्हणाला कि भारतीय लोकांचे "दिल"  कुंठीत आहे....."जगात फक्त पाक च्या लोकांचे मन पाक आहे आणि बाकीचे खुजे आहेत असा साक्षात्कार ह्या आफ्रिदी नामक प्राण्याला झाला...!." आफ्रिदीने तोडलेल्या ह्या अकलेच्या ताऱ्याना गटारीत पडताना पाहून उभय देशातील स्वप्नाळू मंडळी चिंतीत  झाली......भारत -पाक बोलणी पुन्हा फिसकटतील  कि काय अशी शंका ह्या मंडळीस वाटू लागली. आफ्रिदी च्या ह्या पाक-वाक्यांचे समस्त पाकी जनतेने वर्ल्ड कप मधील पराभव विसरून तहे-दिल से स्वागत हि केले आणि आपल्या  असली मानसिकतेची पहेचान अलम दुनियेस दिली......आपल्या कडील गावातल्या पारावरच्या गप्पांमध्ये हि  "कुत्र्याचे शेपूट ते वाकडेच.......!" अशा म्हणीना उजाळा दिला गेला.
भारतीय "दिल" चा असा साक्षात्कार ह्या आफ्रिदीला कसा झाला ह्याचे कुतूहल वाढू लागले......!
ह्या भारतात येऊन भारताचा अनेकदा पाहुणचार घेऊन हि माशी कोठे शिंकली असा सवाल अनेकांना पडला. अरे आफ्रिद्या जर भारताचे "दिल" छोटे राहिले असते तर पाक च्या लोकांचे नापाक कदम आमच्या पवित्र धरतीवर कधी पडले नसते.....अरे ह्या भारतात अझर कप्तान होता....कलाम साहेब राष्ट्रपती होते.....जाकीर हुसेन, ए.आर.रहेमान, सलमान खान,शाहरुख खान,आमीर खान ,दिलीप कुमार सारख्या लोकांना डोक्यावर घेतले जाते.....असे तुझ्या पाक मध्ये आहे का...? उलट अल्पसंख्य हिंदुना हुसकून लावण्यासाठी दंगली माजाविल्या जातात...तेव्हा तुझे तथाकथित "दिल" कोठे जाते?   अरे हि मंडळी तर आमची आहे...आमच्या देशाची नागरिक आहे......तुझ्या पाक मधील सलमा आगा, गुलाम आली, मेहंदी हसन, नुसरत फतेह आली खान, अदनान सामी इ. कलाकार मंडळीस तुझ्या देशापेक्षा जास्त मन-सन्मान,पैसा,प्रतिष्ठा ह्या भारतामध्ये मिळाली....तरी हि म्हणतोस आमचे "दिल" छोटे आहे...? 
ह्या आफ्रिदीच्या वल्गना ऐकून चोहीकडे मिडिया ने गजहब केल्यावर म्हणे त्याला पश्चाताप झाला व मी असे बोललोच नाही.....सारा विपर्यास मिडिया वाल्यांनी केला ....! आता बोला? काय बोलणार....? म्हणा  " बोलाचाच  भात आणि बोलाचीच कढी.......... !"

Tuesday, 5 April 2011

कट्ट्यावरचे शब्दबाण....!

अलीकडे अनेक  महर्षी उदयास येत आहेत.चरित्र आणि चारित्र्य नसणारी.......ज्ञानाचा कोणताही लवलेश किंवा पात्रता नसणारी मंडळी विविध  क्षेत्रात  शेफारत आहे. नुकतेच  बाबुश नावाच्या  एका  इसमास   कस्टम च्या लोकांनी जेरबंद केले. म्हणे त्याच्या थैली    मध्ये करोडो रुपयांचे परकीय चलन होते. हा इसम कोणी चोर व दरवडेखोर नाही तर ते महाशय चक्क गोवा  राज्याचे शिक्षण मंत्री आहेत म्हणे. बहुदा शिक्षण क्षेत्राच्या प्रसारासाठी त्यांनी हे धन संकलित केले असावे.....पूर्वी आपले थोर समाज-सुधारक  सुद्धा जनते कडून द्रव्य गोळा करून गरीब मुलांच्या शिक्षणाची तहान भागवीत होते. कदाचित बाबुश महोदयांना देखील अशाच ज्ञान मंदिराचा पाया घालायचा असेल म्हणून त्यांनी द्रव्य संचय करायला सुरुवात केली असेल. द्रव्यसंचय करणारा फक्त अलम दुनियेत बाबुश साहेब एकटा नाही तर अक्ख्या दुनियेतील मंत्री आणि बाबू लोक असतील.......दुर्दैवाने बाबुश सापडला पण बाकीच्या बाबूंचे काय......?
सांप्रत चा इतिहास आम्हाला बदलावा लागेल......सुरेश कलमाडी, ए.राजा, बाबुश ह्या मंडळी ने नवनवे उच्चांक मोडलेत.........आदर्श तर सर्वश्रुत आहेच.........आहे रे- नाही रे नावाची दरी वाढत आहे......ज्याच्या हाती सत्तेचा पंदा  आहे त्याची चलती आहे......परवा--परवा तर विरोधी पक्ष हि डील होऊ लागलेत....अशी बातमी ऐकायला मिळाली.....सुपाऱ्या घेऊन आरोप करणे.....चौकशीचे आणि बदनामीचे शुक्लकाष्ठ मागे लाऊन आपले इप्सित साधू पाहणारे शुद्र  राजकारण ह्या महाराष्ट्रात फोफावू लागले.......सार्वजनिक जीवनातील शुचिता आणि नीतिमत्तेचा अंत झाला कि काय असे वाटू लागते.....जळगाव जिल्ह्यातील एका आमदारावर तर चक्क बलात्काराचा आरोप झाला.......पक्षाने तातडीची कार्यवाही केली म्हणजे पाणी कोठे तरी मूरत आहे हे निच्छित......!  ज्याला लोकशाहीचा चौथा खांब आम्ही म्हणतो ....जे स्वतःला समांतर न्यायालय समजून आपले विचार वाचकांवर किंवा प्रेक्षकांवर लादत  असतात त्या वृत्तपत्रे आणि वाहिन्यांची विश्वासार्हता हि संपण्यात जमा झालेली आहे.पीत पत्रकारितेला उत आलाय . नको त्यांना प्रसिद्धी देणारे हे बोल=घेवडे लोक फार शिरजोर झालेत. हि दांभिक मंडळी स्वतःला आजचे चित्रगुप्त समजायला लागली आहे.इतरांचे भविष्य आणि भाकीत वर्तवायला लागलीये...आंधळ्यांनी हत्तीचे स्पर्श करून आपले अनुमान सांगावे अशीच गम्मत ह्या मंडळींची हि झालेली आहे. हफ्ते आणि तोडी-पाणी च्या बाबतीत तर त्यांनी गुंड वा पोलीस लोकांना हि मागे टाकलेय ........अण्णासाहेब हजारे मुळे माहिती अधिकार कायदा लागू झाला पण त्याचा उपयोग केवळ तोडी-पाणी साठी किंवा त्रास देण्यासाठी होतो आहे....  ज्याचं नाव घेऊन आम्ही जयजयकार करतो.....आमच्या छात्या फुलून येतात....गर्वाने माना उंचावतात त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात असे प्रकार होताहेत हेच आमचे दुर्दैव.......! जर महाराज असते तर ह्यांचा कडेलोट केला असता........! प्रत्येक सात्विक मनाला प्रचंड संताप येत असतो. हा संताप आमचे तरुण जिम मध्ये जाऊन बॉक्सिंग च्या थैलीवर किंवा व्यायामात जिरवतात ......आमच्यासारखे आर्कुट/फेसबुक/किंवा ब्लोग वर व्यक्त करतात. एकीकडे इजिप्त,लिबिया,सिरिया तील क्रांती चा अंगार तप्त होत असतो...दुसरीकडे क्रिकेट चा वर्ल्ड कप जिंकण्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी फटाक्यांची आतिश बाजी होत असते.....आणि या सर्व भाऊ गर्दीत आम्ही मूळ समस्या विसरून जात असतो. जनतेला जणू सार्वजनिक डीमनेशिया झाला आहे काय अशी शंका वाटू लागते.याही परिस्थितीत अण्णा हजारे जंतर-मंतर वर उपोषणाचा एल्गार  करतात........सुप्त होत जाणारी------धूसर होत जाणारी आशा पुन्हा जगू लागते......!                

Monday, 7 March 2011

"जरी प्राणाहुनी प्रिय अशी देशाची माती ....

"जननी जन्मभूमी स्वर्गादपि गरीयसी", अशा शब्दात स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांनी माता व मातृभूमीची महती वर्णिलेली आहे.जन्मदात्री माता व ज्या भूमीवर जन्माला आलो ती जन्मभूमी स्वर्गाहुनी श्रेष्ठ आहे...म्हणूनच भल्या पाहते निद्रेतून जागे झाल्यावर आम्ही 'वंदे मातरम' म्हणतो.ज्या मातेमुळे आम्हाला हे जग दिसले व ज्या मातृभूमीवर आम्ही जगतोय अशा उभयंता पुढे जगातली सर्व सुखे ..अगदी स्वर्ग देखील आम्हाला त्याज्य आहे. अशी उदात्त व विशाल राष्ट्र भावना आमच्या नसानसातून पिढ्यानुपिढ्या पासून अधिवास करीत आलेली आहे.
प्रखर अशा राष्ट्र्भावनेतूनच राष्ट्रवादाची निर्मिती होते व त्यातूनच राष्ट्रभक्तीची ओढ मनामनाला लागते. भारतासारख्या राष्ट्राला हीच परंपरा लाभली असल्याने भारत जगातला 'महान' देश आहे.
 कदाचित मातृभूमीवर एवढे प्रेम करणारा, मातृभूमीला मातेची उपमा देऊन प्रतिदिन 'वंदे मातरम' करणारा 'भारत' हा विश्वात एकमेव देश असेल.ज्या देशातली राष्ट्र भावना प्रबळ आहे, जेथे नागरिक हे निस्वार्थी व उदारमतवादी देशभक्त असतात अशा देशाला उज्वल भवितव्य असतेच. एका आंग्ल विचारवंताने   म्हटले आहे कि, "एखाद्या देशातले तरुण मन कोणत्या पकारचा विचार करते--त्याच्या आवडी-निवडी -काळ-दृष्टीकोन काय आहे यावरच त्या देशाचे भवितव्य अवलंबून असेल.भारतीय तरुणाई हि राष्ट्रभक्ती ने प्रेरित आहे यात तिळमात्र शंका नाही. अगदी आर्य काळापासून मध्ययुगीन काळापर्यंत .......स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातही युवमान हे नेहमीच देशभक्ती ने भारावलेले होते.....आहे व राहील. मातृभूमीसाठी तन-मन-धन अर्पण करणारी हि तरुणाई जणू गात असते....
"हो जो तैय्यार साथियो....
हो जो तय्यार....
अर्पित कर दो तन-मन-धन .....
मंग राहा है, बलिदान वतन...
अगर देश के काम न आये;
तो जीवन बेकार;
हो जो तय्यार साथियो हो जो तैय्यार....!
राष्ट्रासाठी हि तरुणाई नेहमीच समिधा म्हणून बलिदान करायला सदैव तयार असते याचा प्रत्यय वेळोवेळी आलेला आहेच व पुढेहि तो येईलच.!
कारण 'पूर्व दिव्या भव्य ज्यांचे रम्य त्यांना भाविकाल' या उक्तीनुसार ज्यांचा इतिहास हाच वैभवाने नटलेला असल्याने त्यांचा भाविकाल हि रम्य-अगम्य असेल असे म्हणावेसे वाटते.
पण ; ह्या तरुणांनी बलिदान करावे.....कोणासाठी? राष्ट्रासाठी...! मग राष्ट्र कोणी चालवावे? देश्बाक्तानी---बलिदान करणार्यांच्या वारसांनी कि  भ्रष्ट गटारगंगेत आकंठ बुडालेल्या षंढ जर्जरांनी?
हा खरा प्रश्न आमच्या राष्ट्र-कल्याण वादी मनाला सलतो आहे. त्या बलिदानाचे -असीम त्यागाचे चीज होण्यासाठी सत्तेवर हि राष्ट्रभक्त असणे गरजेचे आहे. नाहीतर ''तुम लढो हम कुर्सी संभालते है.!" कमिशन प्राप्त करणारी.....मृतकाच्या टाळूवरचे लोणी खाणारी मंडळीने या देशाचा कारभार पहायचा? 
एकीकडे या राष्ट्रासाठी भगिनी आपला 'कुंकू' देताहेत......म्हातारे आई-वडील आपला म्हातारपणाचा आधार देताहेत....आणि त्याच राष्ट्राची संपत्ती लुटणारे आधुनिक पेंढारी निपजताहेत..... तर अशा राष्ट्राला रम्य तो भाविकाल कसा असेल हि चिंता आमच्या राष्ट्र कल्याणवादी मनाला सलते आहे....बोचते आहे.
देशभक्तांनी आवेशात 'खून भी देंगे....जन भी देंगे; देश कि मिट्टी कभी नाही देंगे...!' असे म्हणायचे ...आवेशात शत्रूशी दोन हाथ करायचे ...प्रसंगी धारातीर्थी पडायचे...व त्यांच्या बलिदानाने सिंचित या भूवर संधीसाधुनी राज्य करायचे....?
ज्या रयत साठी त्यांनी आपला जीव गमावला त्याच रयतेच्या ताटातील घास पळवणारी कृतघ्न-भ्रष्ट-नतद्रष्ट अवलाद या देशात पाहायला मिळत आहे ....विविध ढोंगी बुरखे परिधान करून मदमस्त चारत आहे.....हे चित्र पाहून 'हे ची फळ काय मम तपाला...? असे म्हणून स्वर्गातील शहीद आपले उर बडवून घेत असतील...!
महाभारतात एक खूपच द्रष्टा संवाद आढळतो...पांडवांच्या विजनवासातील  हा प्रसंग.....! आपले चार हि बंधू एका अज्ञात शक्ती ने पछाडून एका तळ्याकाठी निपचित पडलेले पाहून दु:खी झालेल्या युधिष्ठिरास तो अज्ञात यक्ष काही बौद्धिक प्रश्न विचारतो...त्यातील हा एक प्रश्न...
"यक्ष: कि दृश्य राष्ट्र मृत भवती?
युधिष्ठीर: अराजक राष्ट्र मृत भवती...!"
म्हणजेच यक्ष त्या युधिष्ठिरास विचारतो कि राष्ट्र हे मृत केव्हा होते त्यावेळेस 'अराजकता' असेल तर राष्ट्र मृत होते...नष्ट होते अशा शब्दात युधिष्ठिराने प्रत्युत्तर दिले.
सध्या देशात दृश्य जरी नसली तरी अदृश्य स्वरुपात ....विधायक जरी नसली तरी विघातक स्वरुपात हि अराजकता या देशात आपली पाळे-मुळे घट्ट करीत आहे.
भ्रष्टाचार .....आतंकवाद...दहशतवाद...नक्षलवाद....सत्तालोळूपता...काळाबाजार,गुंडगिरी,भेसळ,राजकारणातील दबंगगिरी ,हफ्तेखोरी आदी लक्षणे हि अराजकतेची असून सर्वच क्षेत्रात त्याची जीवघेणी लागण झालेली आहे. म्हणूनच इजिप्त सारखी क्रांती याही देशात पुन्हा एकदा अपेक्षित आहे.
असे चित्र असल्यावर जि तरुणाई या देशासाठी आपले रक्त सांडण्यास मागे-पुढे पाहत नाही ती कोणती प्रेरणा घेईल?  मग मरावे तरी कोणासाठी? कशासाठी? हा हि एक मोठा सवाल आहे.
जो-तो फक्त आपले इप्सित सध्या करण्यासाठी मश्गुल असल्याने या राष्ट्राची कदर करणारे आहे तरी कोण? या युवापिढीने आदर्श तरी कोणाचा घ्यावा?
म्हणूनच म्हणावे लागते............"जरी  प्राणाहुनी प्रिय अशी देशाची माती ....
तरी मरावे अखेर कोणासाठी...?" 
-------जयपाल सिंह विक्रमसिंह गिरासे
 ९४२२७८८७४०
शिरपूर, जि.धुळे [महाराष्ट्र]

कारभारी आणि गब्बरसिंगनी भेट

 https://youtu.be/oWi2LmB8T4o 'मुक्काम पोस्ट-उबगेलवाडी' आयी लेखक श्री जयपालसिंह गिरासे यासनी लिखेल अस्सल अहिराणी भाषामानं कयबन इनोदी...