Tuesday 30 August 2011

कट्ट्यावरचे शब्दबाण....!



अलीकडे अनेक  महर्षी उदयास येत आहेत.चरित्र आणि चारित्र्य नसणारी.......ज्ञानाचा कोणताही लवलेश किंवा पात्रता नसणारी मंडळी विविध  क्षेत्रात  शेफारत आहे. नुकतेच  बाबुश नावाच्या  एका  इसमास   कस्टम च्या लोकांनी जेरबंद केले. म्हणे त्याच्या थैली    मध्ये करोडो रुपयांचे परकीय चलन होते. हा इसम कोणी चोर व दरवडेखोर नाही तर ते महाशय चक्क गोवा  राज्याचे शिक्षण मंत्री आहेत म्हणे. बहुदा शिक्षण क्षेत्राच्या प्रसारासाठी त्यांनी हे धन संकलित केले असावे.....पूर्वी आपले थोर समाज-सुधारक  सुद्धा जनते कडून द्रव्य गोळा करून गरीब मुलांच्या शिक्षणाची तहान भागवीत होते. कदाचित बाबुश महोदयांना देखील अशाच ज्ञान मंदिराचा पाया घालायचा असेल म्हणून त्यांनी द्रव्य संचय करायला सुरुवात केली असेल. द्रव्यसंचय करणारा फक्त अलम दुनियेत बाबुश साहेब एकटा नाही तर अक्ख्या दुनियेतील मंत्री आणि बाबू लोक असतील.......दुर्दैवाने बाबुश सापडला पण बाकीच्या बाबूंचे काय......?
सांप्रत चा इतिहास आम्हाला बदलावा लागेल......सुरेश कलमाडी, ए.राजा, बाबुश ह्या मंडळी ने नवनवे उच्चांक मोडलेत.........आदर्श तर सर्वश्रुत आहेच.........आहे रे- नाही रे नावाची दरी वाढत आहे......ज्याच्या हाती सत्तेचा पंदा  आहे त्याची चलती आहे......परवा--परवा तर विरोधी पक्ष हि डील होऊ लागलेत....अशी बातमी ऐकायला मिळाली.....सुपाऱ्या घेऊन आरोप करणे.....चौकशीचे आणि बदनामीचे शुक्लकाष्ठ मागे लाऊन आपले इप्सित साधू पाहणारे शुद्र  राजकारण ह्या महाराष्ट्रात फोफावू लागले.......सार्वजनिक जीवनातील शुचिता आणि नीतिमत्तेचा अंत झाला कि काय असे वाटू लागते.....जळगाव जिल्ह्यातील एका आमदारावर तर चक्क बलात्काराचा आरोप झाला.......पक्षाने तातडीची कार्यवाही केली म्हणजे पाणी कोठे तरी मूरत आहे हे निच्छित......!  ज्याला लोकशाहीचा चौथा खांब आम्ही म्हणतो ....जे स्वतःला समांतर न्यायालय समजून आपले विचार वाचकांवर किंवा प्रेक्षकांवर लादत  असतात त्या वृत्तपत्रे आणि वाहिन्यांची विश्वासार्हता हि संपण्यात जमा झालेली आहे.पीत पत्रकारितेला उत आलाय . नको त्यांना प्रसिद्धी देणारे हे बोल=घेवडे लोक फार शिरजोर झालेत. हि दांभिक मंडळी स्वतःला आजचे चित्रगुप्त समजायला लागली आहे.इतरांचे भविष्य आणि भाकीत वर्तवायला लागलीये...आंधळ्यांनी हत्तीचे स्पर्श करून आपले अनुमान सांगावे अशीच गम्मत ह्या मंडळींची हि झालेली आहे. हफ्ते आणि तोडी-पाणी च्या बाबतीत तर त्यांनी गुंड वा पोलीस लोकांना हि मागे टाकलेय ........अण्णासाहेब हजारे मुळे माहिती अधिकार कायदा लागू झाला पण त्याचा उपयोग केवळ तोडी-पाणी साठी किंवा त्रास देण्यासाठी होतो आहे....  ज्याचं नाव घेऊन आम्ही जयजयकार करतो.....आमच्या छात्या फुलून येतात....गर्वाने माना उंचावतात त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात असे प्रकार होताहेत हेच आमचे दुर्दैव.......! जर महाराज असते तर ह्यांचा कडेलोट केला असता........! प्रत्येक सात्विक मनाला प्रचंड संताप येत असतो. हा संताप आमचे तरुण जिम मध्ये जाऊन बॉक्सिंग च्या थैलीवर किंवा व्यायामात जिरवतात ......आमच्यासारखे आर्कुट/फेसबुक/किंवा ब्लोग वर व्यक्त करतात. एकीकडे इजिप्त,लिबिया,सिरिया तील क्रांती चा अंगार तप्त होत असतो...दुसरीकडे क्रिकेट चा वर्ल्ड कप जिंकण्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी फटाक्यांची आतिश बाजी होत असते.....आणि या सर्व भाऊ गर्दीत आम्ही मूळ समस्या विसरून जात असतो. जनतेला जणू सार्वजनिक डीमनेशिया झाला आहे काय अशी शंका वाटू लागते.याही परिस्थितीत अण्णा हजारे जंतर-मंतर वर उपोषणाचा एल्गार  करतात........सुप्त होत जाणारी------धूसर होत जाणारी आशा पुन्हा जगू लागते......!  उपोषण सुरु होते....सम्पूर्ण  देशभर   वातावरण ढवळून निघते.... "मी अण्णा हजारे आहे !" नाव असलेल्या टोप्या सगळीकडे दिसू लागतात.....कालपर्यंत जी तरुण पिढी बिघडली असा आरोप होत होता...तीच तरुण पिढी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या समर्थन साठी गावोगाव  प्रभात फेरी काढते....!  दूरचित्रवाणी ,वृत्तपत्रे आदी चर्चेची गुऱ्हाळे सुरु करतात....! अगदी चित्रगुप्त सारखा आव आणून काही मंडळी आपले भाष्य करीत असते......! सरकार काही ना काही अपशकून करून हे आंदोलन शमवू पाहत होते, परंतु वाढत्या जनरेट्यापुढे  नमते घ्यावे लागले......अण्णांशी बोलणी करून उपोषण थांबविले गेले.....आता मिडिया चर्चा करू लागली आहे कि फेसबुक ,आर्कुट ,गुगल सर्च आदी ठिकाणी अण्णा हजारे नामक व्यक्ती ने लोकप्रियतेचे सारे रेकॉर्ड मोडीत काढले.......हतबल कॉंग्रेस......असमर्थ आणि पोखरलेला ..दुबळा विरोधी पक्ष....साऱ्यांना   आश्वस्त करू शकेल अशा नेतृत्वाचा अभाव....तरीही    ७४ वर्षाचे राळेगण सिद्धी चे अण्णा दिल्लीच काय देशातील प्रत्येक गल्ली-गल्लीत चर्चिले जातात....कट्ट्यावर आशेचे निखारे पेट घेऊ लागतात ......पुन्हा नसा-नसातून रक्त सळसळू लागते....  मुठा आवळल्या जाऊ लागतात.....तोंडातून जोरात शब्द बाहेर येतात...."जय हिंद....!"
---------जयपालसिंह विक्रमसिंह गिरासे,
५०, विद्याविहार कॉलनी,शिरपूर 
९४२२७८८७४०             

कारभारी आणि गब्बरसिंगनी भेट

 https://youtu.be/oWi2LmB8T4o 'मुक्काम पोस्ट-उबगेलवाडी' आयी लेखक श्री जयपालसिंह गिरासे यासनी लिखेल अस्सल अहिराणी भाषामानं कयबन इनोदी...