Friday 15 April 2011

"लोकमत" ने माणुसकी आणि देशप्रेमाचा झरा जिवंत ठेवला.......!

 
ज्या शहिदांचे फक्त नाव घेता आम्हा सर्वांचे हृदय अभिमानाने भरून येते....ज्यांच्या अपूर्व त्यागाचे  गोडवे आम्ही आज हि गात असतो........ज्यांच्या असीम त्यागामुळे आम्ही आजच्या स्वतंत्र राष्ट्रात राहतो...त्यांच्या प्रती आम्ही .....आमचे नेते.....आमचे सरकार किती उदासीन आहे....याचा प्रत्यय बऱ्याचदा आलेला आहे.....तरी  कोणालाही जाग येत नाही. ज्यांनी हसत -हसत घरादारावर विस्तव ठेऊन उभ्या आयुष्याला देशासाठी कुर्बान केले....त्या शहीद क्रांतीवीरांप्रती आम्ही एवढे उदासीन.....एवढे कृतघ्न का झालो? याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. जालियान वाला बाग हत्याकांड चा जनक जनरल डायर ची हत्या करून बदला घेणारे शहीद उधमसिंग इतिहासाच्या पानावर आम्ही वाचतो....त्यांच्या त्या कृतीचा व त्यागाचा आम्ही गौरव करतो....त्यांचेच  वारस जितसिंग आणि त्यांची मुले अत्यंत काबाडकष्ट करीत जीवन कंठीत आहेत.....मोलमजुरी त्यांच्या नशिबी आलेली आहे........उधमसिंग यांचा आत्मा कधीही अपेक्षा करणार नाही .....ज्यांनी या देशासाठी सर्वस्व अर्पिले ते कोणती अपेक्षा करणार..? पण हे आमच्या नेत्यांचे....सरकारचे आद्य कर्तव्य होते कि त्यांनी कृतज्ञता म्हणून शहीद उधमसिंग यांच्या वारसांची दखल घ्यायला हवी होती.....! ज्या देशात एकेका चौकार आणि सत्कार साथी लोकहो रुपयांची खिरापत वाटली जाते.........मंत्री-संत्रींच्या सत्कार व सुरक्षेवर करोडो रुपये खर्चिले जातात....श्रीमंतांच्या चंगळ वादी जीवनशैलीवर धनाची बरसात केली जाते.....त्याच देशात या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाची आहुती देणाऱ्या महान देशभक्तांच्या वारसांची.....सीमांचे रक्षण करणाऱ्या शहीद जवानाच्या कुटुंबियांची अशी हि परवड व्हावी हि बाबच शरम आणणारी आहे.....! 
सर्वत्र कृतघ्न मंडळीचा संचार झाला.......भ्रष्ट ...नतद्रष्ट मंडळींचा वावर झाला......जणूकाही अंधार झाला.....आमच्यातील माणुसकी आटली असे वाटू लागले.  थोड्या थोड्या बाबींवरून ......इतिहासातील घटनांवरून.....रस्त्यावर उतरून आजही आकांड-तांडव करणारे तथाकथित लोक हि या विषयावर गप्प राहिले हि बाबच मोठी खेदजनक आहे......तरीही ह्या परीस्थित दैनिक लोकमत ने माणुसकी आणि देशप्रेमाचा झरा जिवंत ठेवला......शहीद उधमसिंग यांचे वारस जितसिंग यांचा सुमारे अकरा लाख रुपयांची मदत करून गौरव केला.....शहिदांच्या कुटुंबियांना मदतीचा मोठा आधार दिला...हि बाब आशादायी आहे. दै.लोकमत चे प्रमुख श्री विजयजी दर्डा यांनी स्वत: लक्ष घालून हे कार्य तडीस नेले त्याबद्दल या देशातील तमाम देशप्रेमी जनता त्यांचे आभारी आहे.......दैनिक लोकमत चे हे कार्य स्वर्गीय बाबूजी च्या देशप्रेमाची आठवण जरूर देते.........दैनिक लोकमत चे त्रिवार अभिनंदन.......!

Thursday 14 April 2011

हि कैसी दांभिकता....!

नुकतीच अन्न हजारेंच्या उपोषणाची दिल्लीत सांगता झाली. जनतेने जय-जयकार केला....मिडिया ने सारे कव्हरेज टिपण्याचा अथक प्रयास केला.....कट्ट्या-तट्यावर चर्चांना आलेले उधान शमू लागले......स्वत:ला समांतर शासन अथवा न्यायालय समजू लागलेल्या तथाकथित पत्रकार....संघटना आदी मंडळी जाम  खुश झाली.शासनकर्त्या जमातीने हि अखेर नि:श्वास सोडला.अन्न राळेगण सिद्धी ला परतले...जंगी स्वागत मायभूमीत झाले....अटकेपार झेंडे लावणाऱ्या मराठी गड्याने साक्षात दिल्ली हलवून सोडण्याचा आनंद अपूर्व असाच आहे...असो.
   पण म्हणतात न कि काही चांगले झाले कि ते आपल्यातीलच काहीना सहन होत नाही म्हणून....!  उपोषणाच्या बातम्यांच्या रिक्त रकान्यात समस्त मिडिया जगत नव्या बातम्या शोधीत असताना आमच्याच समाजसेवी मंडळीनी हि अडचण हि पूर्ण केली.  निमित्त ठरले ते नरेंद्र मोदी व नितीशकुमार यांच्या वर अण्णांनी स्तुतिसुमने उधळली त्या गोष्टीचे आणि समस्त --नेमस्त मंडळी नाखूष झाली.....नेमस्त मंडळीने हि मिडिया समोर आपली भडास मोकळी केली.....!
सामान्य माणसाला प्रश्न पडला....अण्णांचे काय चुकले?   कालपर्यंत अण्णा हजारे यांच्या पाठीशी मेधाताई पाटकर, मल्लिका साराभाई, अरुणा रॉय, संदीप पांडे, कविता श्रीवास्तव इ. मंडळी होती. ह्या मंडळी बाबत ...त्यांच्या समाज-सेवेबाबत समस्त दुनियेत आदर आहे ह्यात शंका नाही. मग हि मंडळी खप होण्याचे कारण काय?
शांतीभूषण---प्रशांत भूषण ह्यांच्या समावेशाबाबत बाबा रामदेव ह्यांनी शंका उपस्थित केल्यावर ह्या मंडळीने बाबा रामदेवजी वर ताशेरे ओढले होते. आता हीच मंडळी अण्णा हजारेंवर ताशेरे ओढीत आहे.
नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार ह्या नेत्यांनी आपल्या राज्यातील ग्रामविकास ज्या गतीने केला आहे त्यास संपूर्ण देशात तोड नाही. साहजिकच अण्णा हजारेनी त्यांची तारीफ केली ...ह्यात वावडे ते काय? पण उपर निर्दिष्ट समाजवादी मंडळीस मोदी आणि नितीशकुमार ह्यांचे भारी वावडे आहे.........हि मंडळी जिवंत आहे हे देखील ह्या लोकांना खटकत असेल असे मला वाटते....! हे स्वत:स समांतर न्यायालय समजू लागले आहेत कि काय? .ह्या देशात कोण चांगले आणि कोण वाईट हे प्रमाणपत्र ह्या मंडळीने वाटण्यास सुरुवात केली कि काय अशी शंका वाटू लागलेली आहे.  एकंदरीत एवढा संकुचित दृष्टीकोन ह्या उभय मंडळींकडून देशाला व पर्यायाने जनतेला अपेक्षित नाही. हि दांभिकता नाही काय.....?

Wednesday 6 April 2011

आफ्रिदीचे ऐसे बरळणे दळभद्री ......!

नुकताच भारत -पाक सामना झाला.....दोन्ही देशातील जनतेने आणि नेत्यांनी  ह्या सामन्याचा आनंद लुटला......दोन्ही बाजूनी स्वप्नाळू आणि आशावादी लोकांनी (ज्यांना व्यर्थ वेळ आणि पैसा खर्च करण्याची हौस असते.....त्यांच्या खिशातून जात नाही म्हणून....!) चर्चेची गुऱ्हाळे सुरु केली. ''येरे माझ्या मागल्या अन शिळ्या  भाकरी चांगल्या'' ह्या  उक्तीनुसार पुन्हा पुन्हा तेच व्यर्थ प्रयोग करण्यात ह्या मंडळीना फार उत्साह येतो असे म्हणतात...!  असो....भारताने पाक ला पराभूत केले.....पाहता पाहता लंका हि सर केली आणि विश्व कप  हि जिंकला....!
वृत्तपत्रे.....दुरचित्र वाहिन्या आणि कट्टे-तट्टे आदींवर शिमग्या नंतरचे  कवित्व हि सुरु झाले......!
ह्यात कडी कि काय ज्याच्यावर आम्ही एक गुणी खेळाडू म्हणून अपार प्रेम केले.....त्या आफ्रिदी नामक व्यक्तीने अकलेचे तारे तोडले आणि अलम दुनियेत त्यावर रकाने भरून निघाले.....माध्यमांना वैरण मिळाली.
भारताकडून सपाटून मार खाल्यावर म्हणे ह्या आफ्रिदीने पाक ला परत गेल्यावर भारत देशाबाबत पाकी मानसिकतेत एव्हढा राग का आहे असे विधान केले.....त्याच्या ह्या विधानावर आमच्याकडील स्वप्नाळू मंडळीना हि जाम आनंद झाला....आफ्रिदीच्या खिलाडू वृत्तीवर स्तुतिसुमने उधळली जाऊ लागलीत. काही सज्जनांनी तर उभय देशात सौहार्द निर्माण करण्यासाठी हा आफ्रिदी मोठा दुवा ठरेल असे भाकीत हि वर्तवल्याचे एकण्यात आले............त्याचे हे विधान ऐकून उभय देशातील क्रिकेट चाहत्यांच्या मनात आफ्रिदी बद्दल आदर निर्माण झाला....नाहीतरी आम्ही भारतीय हीच भावना बाळगत  आलेलो आहोत हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. खेळ आणि खिलाडू वृत्ती जगाने भारताकडून शिकावी असे लिहिण्याचे  धाडस हि आम्ही  करतो. आफ्रिदी बद्दल अभिमान वाटू लागत असताना त्याने दुसर्याच दिवशी पुन्हा गजहब केला...... म्हणाला कि भारतीय लोकांचे "दिल"  कुंठीत आहे....."जगात फक्त पाक च्या लोकांचे मन पाक आहे आणि बाकीचे खुजे आहेत असा साक्षात्कार ह्या आफ्रिदी नामक प्राण्याला झाला...!." आफ्रिदीने तोडलेल्या ह्या अकलेच्या ताऱ्याना गटारीत पडताना पाहून उभय देशातील स्वप्नाळू मंडळी चिंतीत  झाली......भारत -पाक बोलणी पुन्हा फिसकटतील  कि काय अशी शंका ह्या मंडळीस वाटू लागली. आफ्रिदी च्या ह्या पाक-वाक्यांचे समस्त पाकी जनतेने वर्ल्ड कप मधील पराभव विसरून तहे-दिल से स्वागत हि केले आणि आपल्या  असली मानसिकतेची पहेचान अलम दुनियेस दिली......आपल्या कडील गावातल्या पारावरच्या गप्पांमध्ये हि  "कुत्र्याचे शेपूट ते वाकडेच.......!" अशा म्हणीना उजाळा दिला गेला.
भारतीय "दिल" चा असा साक्षात्कार ह्या आफ्रिदीला कसा झाला ह्याचे कुतूहल वाढू लागले......!
ह्या भारतात येऊन भारताचा अनेकदा पाहुणचार घेऊन हि माशी कोठे शिंकली असा सवाल अनेकांना पडला. अरे आफ्रिद्या जर भारताचे "दिल" छोटे राहिले असते तर पाक च्या लोकांचे नापाक कदम आमच्या पवित्र धरतीवर कधी पडले नसते.....अरे ह्या भारतात अझर कप्तान होता....कलाम साहेब राष्ट्रपती होते.....जाकीर हुसेन, ए.आर.रहेमान, सलमान खान,शाहरुख खान,आमीर खान ,दिलीप कुमार सारख्या लोकांना डोक्यावर घेतले जाते.....असे तुझ्या पाक मध्ये आहे का...? उलट अल्पसंख्य हिंदुना हुसकून लावण्यासाठी दंगली माजाविल्या जातात...तेव्हा तुझे तथाकथित "दिल" कोठे जाते?   अरे हि मंडळी तर आमची आहे...आमच्या देशाची नागरिक आहे......तुझ्या पाक मधील सलमा आगा, गुलाम आली, मेहंदी हसन, नुसरत फतेह आली खान, अदनान सामी इ. कलाकार मंडळीस तुझ्या देशापेक्षा जास्त मन-सन्मान,पैसा,प्रतिष्ठा ह्या भारतामध्ये मिळाली....तरी हि म्हणतोस आमचे "दिल" छोटे आहे...? 
ह्या आफ्रिदीच्या वल्गना ऐकून चोहीकडे मिडिया ने गजहब केल्यावर म्हणे त्याला पश्चाताप झाला व मी असे बोललोच नाही.....सारा विपर्यास मिडिया वाल्यांनी केला ....! आता बोला? काय बोलणार....? म्हणा  " बोलाचाच  भात आणि बोलाचीच कढी.......... !"

Tuesday 5 April 2011

कट्ट्यावरचे शब्दबाण....!

अलीकडे अनेक  महर्षी उदयास येत आहेत.चरित्र आणि चारित्र्य नसणारी.......ज्ञानाचा कोणताही लवलेश किंवा पात्रता नसणारी मंडळी विविध  क्षेत्रात  शेफारत आहे. नुकतेच  बाबुश नावाच्या  एका  इसमास   कस्टम च्या लोकांनी जेरबंद केले. म्हणे त्याच्या थैली    मध्ये करोडो रुपयांचे परकीय चलन होते. हा इसम कोणी चोर व दरवडेखोर नाही तर ते महाशय चक्क गोवा  राज्याचे शिक्षण मंत्री आहेत म्हणे. बहुदा शिक्षण क्षेत्राच्या प्रसारासाठी त्यांनी हे धन संकलित केले असावे.....पूर्वी आपले थोर समाज-सुधारक  सुद्धा जनते कडून द्रव्य गोळा करून गरीब मुलांच्या शिक्षणाची तहान भागवीत होते. कदाचित बाबुश महोदयांना देखील अशाच ज्ञान मंदिराचा पाया घालायचा असेल म्हणून त्यांनी द्रव्य संचय करायला सुरुवात केली असेल. द्रव्यसंचय करणारा फक्त अलम दुनियेत बाबुश साहेब एकटा नाही तर अक्ख्या दुनियेतील मंत्री आणि बाबू लोक असतील.......दुर्दैवाने बाबुश सापडला पण बाकीच्या बाबूंचे काय......?
सांप्रत चा इतिहास आम्हाला बदलावा लागेल......सुरेश कलमाडी, ए.राजा, बाबुश ह्या मंडळी ने नवनवे उच्चांक मोडलेत.........आदर्श तर सर्वश्रुत आहेच.........आहे रे- नाही रे नावाची दरी वाढत आहे......ज्याच्या हाती सत्तेचा पंदा  आहे त्याची चलती आहे......परवा--परवा तर विरोधी पक्ष हि डील होऊ लागलेत....अशी बातमी ऐकायला मिळाली.....सुपाऱ्या घेऊन आरोप करणे.....चौकशीचे आणि बदनामीचे शुक्लकाष्ठ मागे लाऊन आपले इप्सित साधू पाहणारे शुद्र  राजकारण ह्या महाराष्ट्रात फोफावू लागले.......सार्वजनिक जीवनातील शुचिता आणि नीतिमत्तेचा अंत झाला कि काय असे वाटू लागते.....जळगाव जिल्ह्यातील एका आमदारावर तर चक्क बलात्काराचा आरोप झाला.......पक्षाने तातडीची कार्यवाही केली म्हणजे पाणी कोठे तरी मूरत आहे हे निच्छित......!  ज्याला लोकशाहीचा चौथा खांब आम्ही म्हणतो ....जे स्वतःला समांतर न्यायालय समजून आपले विचार वाचकांवर किंवा प्रेक्षकांवर लादत  असतात त्या वृत्तपत्रे आणि वाहिन्यांची विश्वासार्हता हि संपण्यात जमा झालेली आहे.पीत पत्रकारितेला उत आलाय . नको त्यांना प्रसिद्धी देणारे हे बोल=घेवडे लोक फार शिरजोर झालेत. हि दांभिक मंडळी स्वतःला आजचे चित्रगुप्त समजायला लागली आहे.इतरांचे भविष्य आणि भाकीत वर्तवायला लागलीये...आंधळ्यांनी हत्तीचे स्पर्श करून आपले अनुमान सांगावे अशीच गम्मत ह्या मंडळींची हि झालेली आहे. हफ्ते आणि तोडी-पाणी च्या बाबतीत तर त्यांनी गुंड वा पोलीस लोकांना हि मागे टाकलेय ........अण्णासाहेब हजारे मुळे माहिती अधिकार कायदा लागू झाला पण त्याचा उपयोग केवळ तोडी-पाणी साठी किंवा त्रास देण्यासाठी होतो आहे....  ज्याचं नाव घेऊन आम्ही जयजयकार करतो.....आमच्या छात्या फुलून येतात....गर्वाने माना उंचावतात त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात असे प्रकार होताहेत हेच आमचे दुर्दैव.......! जर महाराज असते तर ह्यांचा कडेलोट केला असता........! प्रत्येक सात्विक मनाला प्रचंड संताप येत असतो. हा संताप आमचे तरुण जिम मध्ये जाऊन बॉक्सिंग च्या थैलीवर किंवा व्यायामात जिरवतात ......आमच्यासारखे आर्कुट/फेसबुक/किंवा ब्लोग वर व्यक्त करतात. एकीकडे इजिप्त,लिबिया,सिरिया तील क्रांती चा अंगार तप्त होत असतो...दुसरीकडे क्रिकेट चा वर्ल्ड कप जिंकण्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी फटाक्यांची आतिश बाजी होत असते.....आणि या सर्व भाऊ गर्दीत आम्ही मूळ समस्या विसरून जात असतो. जनतेला जणू सार्वजनिक डीमनेशिया झाला आहे काय अशी शंका वाटू लागते.याही परिस्थितीत अण्णा हजारे जंतर-मंतर वर उपोषणाचा एल्गार  करतात........सुप्त होत जाणारी------धूसर होत जाणारी आशा पुन्हा जगू लागते......!                

कारभारी आणि गब्बरसिंगनी भेट

 https://youtu.be/oWi2LmB8T4o 'मुक्काम पोस्ट-उबगेलवाडी' आयी लेखक श्री जयपालसिंह गिरासे यासनी लिखेल अस्सल अहिराणी भाषामानं कयबन इनोदी...